Saturday, January 3, 2009

इस्राएलमध्ये फडकतेय मराठीची ध्वजा

"आम्ही इस्राएलहून आलोय...' मांडवी हॉटेलच्या लिफ्टमध्ये योगायोगाने भेटलेल्या दोघा अपरिचित व्यक्तींच्या या वाक्याने मी जरा दचकलोच. ओळख होताच त्यांनी आपले व्हिजिटिंग कार्ड पुढे केले... "नोहा मस्सील'... क्षणात ओळख पटली. "लोकसत्ते'त त्यांचा लेख अलीकडेच वाचल्याचे आठवले आणि जागतिक मराठी परिषदेसाठी इस्राएलहून आलेल्या नोहा मस्सीलनी क्षणात आपलेसे करून टाकले.
ते आणि त्यांचे मित्र आयझॅक आवासकर जागतिक मराठी परिषदेच्या गोव्यातील अधिवेशनासाठी आले आहेत. ते इस्राएलमध्ये गेली वीस वर्षे "मायबोली' हे त्रैमासिक चालवतात. त्यांचे दोन मराठी काव्यसंग्रहही निघाले आहेत. साहजिकच माझी उत्सुकता चाळवली जाते. भेट ठरते. आणि एक अनोखी कथा ते माझ्यासमोर उलगडत जातात...

बेने इस्राएलींची पार्श्वभूमी

""२७०० वर्षांपूर्वी रोमनांनी पॅलेस्टाईनवर (आताचे इस्राएल) हल्ला चढवला. त्यावेळी तेथील लोक जीव वाचवण्यासाठी समुद्रमार्गाने पळत सुटले. असेच एक जहाज भारताच्या दिशेने निघाले. पण भारताच्या किनाऱ्याला लागण्याआधीच अलीबागजवळ नवगाव येथे हे जहाज बुडाले. अनेकांना सागराने उदरात घेतले. जे काही जगले वाचले, ते नवगावच्या किनाऱ्याला लागले. बुडालेल्यांच्या मदतीसाठी स्थानिक कोळी धावले. पण यांची भाषा त्यांना समजेना. मग हातवाऱ्यांच्या आधारे संवाद साधला गेला. जहाजातून जे आले होते ते सारे धर्माने ज्यू होते. त्यातल्या अनेकांचे मृतदेह किनाऱ्यावर येऊन थडकले. मग त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी स्थानिक कोळी पुढे सरसावले. त्यांना या मृतदेहांचे दहन करायचे होते, पण ज्यूंमध्ये दहन करत नाहीत, मृतदेह दफन करतात. जे सुखरूप किनाऱ्याला लागले होते त्यांनी हातवाऱ्यांनी स्थानिकांना हे सांगितले. पण प्रश्न निर्माण झाला की या मृतदेहांच्या दफनासाठी जागा कोण देणार? शेवटी किनाऱ्याला लागलेल्या ज्यूंनी सोबतची नाणी टाकली. त्या पैशांतून घेतलेल्या जागेत भारतातील ज्यूंची पहिली दफनभूमी अलीबागजवळ नवगावच्या किनाऱ्यावर उभी राहिली. हे घडले २७०० वर्षांपूर्वी. ''

अनोखी आडनावे

""त्यावेळी जे नवगावच्या किनाऱ्याला लागले, ते महाराष्ट्राचेच होऊन गेले. त्यांना स्थानिक गावांच्या नावांनी ओळखले जाऊ लागले. जे नवगावला राहिले ते नवगावकर झाले. आवासला राहिले ते आवासकर, मशेळला राहिले ते मशेळकर, पेणकर, दांडेकर अशा नावांनी हे ज्यू ओळखले जाऊ लागले. आज इस्राएलमध्ये जे हजारो भारतीय ज्यू आहेत, त्या पुढच्या पिढ्यांतही हे आगळे वैशिष्ट्य आजही दिसते. त्यांची नावे मोझेस, आयझॅक अशी असतात, पण आडनावे मात्र अस्सल भारतीय व तीही महाराष्ट्रीय वळणाची आहेत.
जहाज दुर्घटनेमुळे जे येथे आले, त्यांना पुन्हा मायभूमीला परतण्याची काही शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे येथे राहायचे तर उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. इस्राएलमध्ये त्यांचा व्यवसाय होता ऑलिव्ह ऑईलचे उत्पादन. तिथे त्याचा मोठा व्यापार चाले. अरब व्यापारी त्यांच्याकडून ती विकत घेत. त्यामुळे भारतात चरितार्थासाठी या इस्राएलींनी पहिला व्यवसाय सुरू केला तो तेलघाण्याचा.''

"शनवार तेली' का?

""ज्यूंमध्ये शनिवार हा दिवस फार पवित्र मानला जातो. त्या दिवशी ज्यू कोणतेही काम करत नाहीत. त्यांना तशी धर्माज्ञा आहे. शनिवारी ते पूर्णतः आराम करीत ईश्र्वरचिंतन करतात. त्या दिवशी जेवणही बनवत नाहीत. त्यामुळे या नव्या तेल्यांना "शनवार तेली' म्हटले जाऊ लागले. अन्य तेली समाजाला महाराष्ट्रात "सोमवार तेली' म्हणतात कारण ते शंकराचे भक्त असतात. स्थानिकांनी जरी या ज्यूंना शनवार तेली म्हणून संबोधले तरी त्यांनी स्वतःला बेने इस्राएली म्हणवून घेतले. "बेने इस्राएल'चा अर्थ "इस्राएलचे पुत्र.' हळूहळू या ज्यूंनी उत्तर कोकणात आपला जम बसवला. तेथे शेतीवाडी घेतली. ज्यू हे मुळात न्यायप्रिय. त्यामुळे स्थानिकांनी गावच्या पंचायतीत त्यांनाही सामावून घेतले. अपघाताने येथे आलेले ज्यू येथे गुण्यागोविंदाने राहिले.'' नोहा मस्सील आपल्या वंशाच्या इतिहासाचा पट उलगडत जातात...
धर्माने ज्यू असूनही ही मंडळी वृत्तीने पूर्ण भारतीय बनली. त्यांनी येथील भाषा आत्मसात केल्या. येथील मनोवृत्ती जाणून घेतली. त्यांच्या नव्या पिढीचा ओढा "व्हाईट कॉलर' नोकऱ्यांकडे जास्त वळला. बेने इस्राएलींच्या पुढच्या पिढ्या सर्वार्थाने मराठीच बनल्या.

"इस्राएल' राष्ट्रनिर्मिती

एकीकडे हे संक्रमण घडत असताना भारतापासून हजारो मैल दूर, ज्यूंच्या मायभूमीत काही वेगळे घडत होते. भारत स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्या वर्षी १४ मे १९४८ रोजी "इस्राएल' राष्ट्राची स्थापना झाली. हिटलरचा छळ सोसलेल्या ज्यूंची पावले तेथे वळली. जगभरातून ज्यू आपल्या मायभूमीत परतू लागले. आपल्या देशातही यावेळी जवळजवळ तीस हजार ज्यू होते. त्यातले बहुसंख्य महाराष्ट्रातच होते.
येथे स्थायिक झालेल्या ज्यूंची पावले पुन्हा इस्राएलकडे का वळली या माझ्या प्रश्नावर नोहा मस्सील सांगू लागले, ""आमची जी धार्मिक प्रार्थना आहे. त्यात "पुढच्या वर्षी जेरुसलेमला जायला हवं' अशी एक ओळ येते. आपल्या मायभूमीची ही ओढ येथील ज्यूंना अस्वस्थ करीत होतीच. इस्राएलकडे जगभरातील ज्यूंचा ओघ वळला, तशी येथील तरुण माणसेही चांगल्या भवितव्यासाठी इस्राएलला जाऊ लागली. १९४६ ते १९८० या कालखंडात भारतातून जवळजवळ तीस हजार ज्यू इस्राएलच्या वास्तव्यास गेले.''
""मी १९७० मध्ये इस्राएलला गेलो, तेव्हा २४ वर्षांचा होतो. माझे दोन भाऊ आधी गेले. नंतर बहीण गेली. आपणही जाऊया असे मला वाटले...'' नोहा मस्सील यांनी तेव्हा "भूतलावरल्या ज्यू बांधवांनो, जेरुसलेम ही मारी हाक' अशी कविताही केली होती. त्या साली इस्राएलमधील मराठी भाषकांची संख्या पंचवीस हजारच्या आसपास होती.

८० देशांतून मायभूमीत

जगभरातील ऐंशी देशांमधून ज्यू आपल्या मायभूमीत, इस्राएलमध्ये परतले होते. प्रत्येकजण आपापली भाषा घेऊन आला होता. त्यात मराठी माणसेही होती. मात्र, ज्यूंच्या प्रार्थनेची भाषा हिब्रूच होती. ""आम्ही ज्या प्रार्थना करायचो, त्यांचा अर्थ आम्हाला कळत नसे, कारण त्या हिब्रूत होत्या. संस्कृतप्रमाणेच हिब्रू ही मृतभाषा गणली जाऊ लागली होती. इस्राएलने या भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान दिले. जगभरातून आलेले ज्यू त्या भाषेत बोलू, लिहू लागले...''
""इस्राएलमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसांची सांस्कृतिक भूक भागवणारे उपक्रम तेथे हळूहळू सुरू झाले. १९८६ साली फ्लोरा सॅम्युअल या मुंबईत प्राध्यापिका होत्या. त्यांनी "मायबोली' ची स्थापना केली होती. मी, आयझॅक आवासकर, मोझेस चांडगावकर, एलिझाबेथ डेविड वगैरे मिळून इस्राएलमध्ये हे "मायबोली' त्रैमासिक चालवतो आहोत. गेली वीस वर्षे हा उपक्रम सुरू आहे. चौदा वर्षांपूर्वी त्याची रीतसर नोंदणीही झाली आहे.'' नोहा मस्सील सहजपणे सांगून जातात खरे, पण मराठी मुलखापासून कोसों दूर एखादे मराठी नियतकालिक सुरू करणे, तेही वीस वर्षांपूर्वी सुरू करणे हे किती अवघड काम असेल याचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. या नियतकालिकासाठी इस्राएलमध्ये मराठी साहित्य नेमाने कसे गोळा करता आले असेल? त्याची देवनागरीत छपाई कशी केली असेल? खर्च कसा भागवला असेल?...
नोहा मस्सील शंकानिरसन करू लागतात... ""सुरवातीला संगणक वगैरे नव्हते. "मायबोली'ची तीस ते पन्नास पाने अक्षरशः हाताने लिहून काढून त्याची फोटो प्रत बनवून छापायचो. नंतर संगणक आले आणि संगणकावर छापू लागलो. आमच्याबरोबर महाराष्ट्रातून जे गेले होते, ते या नियतकालिकासाठी लेखन करीत असत, शिवाय येथील लेखकांचे साहित्यही आम्ही घेत असू.''
मस्सील यांचे मित्र आयझॅक आवासकर यांनी त्याला पुस्ती जोडताना सांगितले, ""सुरवातीला या नियतकालिकाचे सहाशे ते सातशे सभासद होते. मग काही कमी झाले. तरीही चारशे सभासद आजही आहेत.'' आयझॅक १९७२ साली इस्रायलला गेले. पण त्यापूर्वी त्यांनी मोहन वाघांच्या "चंद्रलेखा' संस्थेच्या नाटकांतून भूमिका केलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये अनेक ज्यू हे मोठे कलाकार होते. येरेन जोसेफ यांनी "तो मी नव्हेच' मध्ये भूमिका केल्या आहेत., चित्रपटांतून कामे करणारा डेव्हीड, प्रसिद्ध कवी इझिकेल अशी अनेक मंडळी बेने इस्रायली वंशाची आहेत.
""भारतात आम्ही भेटप्रती पाठवतो, पण युरोप, अमेरिकेत आमचे हितचिंतक आहेत. त्या सर्वांकडून आम्ही वर्गणी घेतो. ना नफा, ना तोटा तत्त्वावर "मायबोली' चालवतो.''
इस्राएलमधली मराठी मंडळी तेथे दरवर्षी एक मे रोजी "महाराष्ट्र दिन' साजरा करतात. संपूर्ण दिवसभर कार्यक्रम असतात. त्यांना भारतातून आजवर स्व. सुधीर जोशी, दिलीप प्रभावळकर, यशवंत देव, अशोक नायगावकर अशी मोठी कलाकार मंडळी गेलेली आहेत.

इस्राएल - अरब संघर्ष

इस्राएलमध्ये "मायबोली' चालवताना येणाऱ्या आव्हानांवर बोलत असताना चर्चेचा ओघ स्वाभाविकच इस्राएलचा पॅलिस्टिनींशी, अरबांशी चाललेला संघर्ष, तेथील अल्प पाण्यावरील प्रगत शेती आदींवर आला. मलेशिया, केनियाप्रमाणे वांशिक संघर्ष नाही ना, या माझ्या प्रश्नावर मस्सील म्हणाले, ""अरब आत्मघाती पथकांचा धोका इस्राएलमध्ये आहे. पण तो सर्वांनाच आहे. इतर देशांप्रमाणे तेथे वांशिक संघर्ष नाही. आम्हा भारतीय ज्यूंनाही तेथे हक्क आहेत. आमची मुले लष्करात घेतात. सामाजिक मदत मिळते. सर्वांच्या पगारातून आरोग्य विम्याचे पैसे कापले जातात. त्यातून औषधे मिळतात. सर्वांना आरोग्यसेवा मिळते. जगभर कुटुंबनियोजनाचा आग्रह धरला जातो. इस्राएलमध्ये उलट आहे. तेथे जेवढी जास्त मुले, तेवढे पैसे मिळतात, कारण ज्यूंची लोकसंख्या वाढवण्याची आज जरूरी आहे. इस्राएलमध्ये बेकारी भत्ता दिला जातो. त्यामुळे शिक्षणानंतर सहा महिने घरी बसावे लागले तरी ते पैसे मिळतात. इस्राएल शेतीत तर प्रगत आहेच, पण तेथे लढाईची सामुग्री बनवणारे कारखाने आहेत. स्वयंचलित विमाने तयार केली जातात. अमेरिकेशी इस्राएलचे चांगले संबंध आहेत. अरबांचा प्रतिकार करण्यासाठी मध्य पूर्वेत तळ हवा म्हणून अमेरिका ज्यूंच्या या राष्ट्राला मदत करते आहे. अरब राष्ट्रेही इराणसारखा अपवाद वगळला तर आता मवाळ बनत आहेत. त्यामुळे त्यांनी इस्राएलशी शांतता करार करावेत असा आग्रह अमेरिका धरते आहे.''
इस्राएल आणि भारत यांचे राजकीय संबंध अलीकडेपर्यंत नव्हते. ९२ साली ते राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यावर प्रस्थापित झाले. इस्राएलचा दूत भारतात आला व भारताचा तेल अविवला जाऊन बसला. या घटनेचे इस्राएलमधील तमाम भारतीय ज्यूंनी मनापासून स्वागत केले.

हिब्रूचे वर्चस्व

"तुमची पुढची पिढीही मराठी बोलते का?' या माझ्या प्रश्नावर मात्र नोहा मस्सीलनी नकारार्थी उत्तर दिले. तेथील ज्या घरांत मराठी बोलली जाते, त्यांना मराठी समजते, पण शिक्षणात हिब्रूलाच स्थान असल्याने व आजूबाजूला सर्व हिब्रूच बोलली जात असल्याने नव्या पिढीला मराठी येत नाही ही खंत त्यांना आहेच. इस्राएलमध्ये इंग्रजीचे आपल्यासारखे प्रस्थ नाही. तेथे जे इंग्रजी बोलणारे मुत्सद्दी येतात, त्यांच्या मुलांसाठी काही इंग्रजी शाळा आहेत, पण त्या महागड्या आहेत. त्यामुळे तिथे कोणी मुलांना पाठवत नाही.
""आमचं ऐकून मुलं मराठी बोलायचा प्रयत्न करतात, पण भाषेचा गोंधळ असल्याने आजोबांनाही अरेतुरे करू लागतात. "ए आजोबा, कुठे गेला होतास' असे विचारू लागतात, त्यामुळे त्यांनी असं अर्धंकच्चं मराठी न बोललेलंच बरं असं आम्हाला वाटतं''असे नोहा मस्सील यांनी गमतीने सांगितले.

भारताशी नाळ

भारतापासून, मराठी मुलखापासून हजारो मैल दूर राहून मराठीची सेवा करणाऱ्या या मंडळींची नाळ भारताशीही जुळलेलीच आहे. दरवर्षीच काय, वर्षातून तीन तीनवेळाही ही मंडळी भारतात येतात. मराठी मुलखापासून कोसों दूर राहून मायमराठीची सेवा करणारे आपण येथील मराठीभाषकांकडून काय अपेक्षा करता, या प्रश्नावर नोहा मस्सील म्हणाले, ""आपली भारतीय मंडळी आता इस्राएलमध्ये व्यापारउदिमासाठी चालली आहेत. त्यांनी तेथील भारतीय ज्यूंची मदत घेतली पाहिजे. त्यांना प्राधान्य दिलं जावं, कारण ती आपली माणसं आहेत. तेथे हिब्रूतून भाषांतराची गरज भासते. आपली माणसं ते करू शकतात. त्यामुळे इस्राएलशी व्यावसायिक कारणांसाठी ज्यांचा संबंध येतो, त्या मराठी माणसांनी तेथील मराठीभाषक ज्यूंची मदत घेतली पाहिजे. आम्ही सर्वतोपरी मदत द्यायला तयार आहोत. पैशांपेक्षाही आपली मदत झाली ही भावना आमच्यासाठी मोलाची असेल...'' युरोपमधील मराठी भाषकांची एक वेगळी संघटना आहे. जागितक मराठी परिषद आणि ती संघटना यांच्यात समन्वय साधण्याचे प्रयत्न सध्या नोहा मस्सील व त्यांचे सहकारी करीत आहेत. आपण मराठीभाषकांच्या या दोन जागतिक संस्थांच्या समन्वयाचा दुवा ठरावे असे त्यांना वाटते. त्यांचे ते स्वप्न साकारो आणि मराठी भाषेची आणि संस्कृतीची पताका जगाच्या क्षितिजावर सदोदित फडकत राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा!

Sunday, November 9, 2008

How To Trace Any IP-Address Or Website ?




Here's a video i created which guides you through the process of Tracing IP address of any Website Or Individual

Step 1 : Go to Start > Run > Then Type " CMD "

Step 2 : MS-DOS windows will open type there " Tracert" ( Name of the webiste you wanna trace) EG: www.google.com

Step 3 : Then press ENTER

Step 4 : You will get a whole list of IP ADDRESSES including yours , Choose the LAST IP ADDRESS that is the IP you were looking for

Step 5 : Open your internet browser and type in the address bar
www.ip-address.com

Step 6 : Then take The last IP address you saw in MS-dos windows and type that IP in the search box and click LOOK UP

Step 7 : Now you are instantly given a map and if you click the " big satellite image " it will actually give you the satellite image of the Location of the IP you just traced

This comes in handy while tracing Hackers and Spammers

EnJoY